Friday, May 20, 2022

अंगारकी चतुर्थी



 अंगारकी.....

कृष्ण पक्षातील चौथी तिथी मंगळवारी आली तर ती अंगारकी. मंगळ ग्रह लालसर दिसतो. म्हणून अंगारक (निखारा). एका चांद्रमासात एक कृष्ण चतुर्थी. त्यादिवशी सात वारांतील कोणताही वार असण्याचा संभव समान म्हणून अंगारकीची संभवनीयता सात मासांत एक. साधारणत: तीन सौर वर्षांत पाचदा अंगारकी येते.

मंगळ ग्रह आणि मंगळवार यांचा संबंध नावापुरताच. कुतिपुत्र अर्जुन आणि सचिनपुत्र अर्जुन याचा नाममात्र संबंध तसाच अंगारकीचा मंगळ ग्रहाशी सुतराम संबंध नाही.

चतुर्थीला अन्य तिथ्यांहून काही वेगळे महत्त्व आहे का? त्या तिथीला पृथ्वीवरून चंद्राचा विशिष्ट आकाराचा भाग प्रकाशित दिसतो हे खरे. पण ते केवळ दिसणे आहे. खरे काय आहे? सूर्यमालेतील सर्व ग्रह, उपग्रह, लघुग्रह हे निर्जीव गोलाकार पिंड (बॉडीज्) आहेत. त्यांना स्वत:चा प्रकाश नाही. सूर्याच्या प्रकाशात तरंगत फिरतात. त्यांच्या अर्ध्या भागावर प्रकाश असणार तर अर्ध्यावर अधार हे त्या सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे.

प्रत्येक तिथीला चंद्राचा अर्धा भाग प्रकाशित तर अर्धा अंधारित असतोच. (ग्रहणाचा कालावधी सोडून.) म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, चतुर्थीचा, अष्टमीचा, संकष्टीचा, अमावास्येचा चंद्र सारखाच अर्धा भाग प्रकाशित असलेला.चंद्र पृथ्वी भोवती फिरतो म्हणून त्याच्या प्रकाशित भागातील कमी-अधिक भाग आपल्याला दिसतो. ती चंद्राकोर. समजा आपण यानात बसून अवकाशात गेलो. आणि चंद्राभोवती एक फेरी घातली. तर तेवढ्या वेळात आपल्याला अमावास्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावास्या अशा चंद्राच्या सर्व कला दिसतील. म्हणजे चतुर्थीच्या चंद्राचे कोणतेही अंगभूत वैशिष्ट्य नाही.

मंगळवाराला इतर वारांच्या तुलनेत वेगळे महत्त्व मुळीच नाही. जेव्हा बाजार-हाटासाठी सात दिवसाचे चक्र ठरले तेव्हा व्यावहारिक सोयीसाठी सात दिवसाना नावे द्यायचे सुचले ( इ.स.पू 2300). योगायोगाने ग्रहांची संख्याही सातच, त्यांना आधीच नावे दिली होती. तीच नावे, कोण्या एका दिवशी वारांना दिली. ती जगभर रूढ झाली. आजही तीच प्रचलित आहेत. हे नामकरण दोन दिवस आधी अथवा नंतर झाले असते तर 25-12 2018 या दिवशी मंगळवार नसता. चतुर्थी असती. पण अंगारकी नसती. कोणत्याही वाराला अंगभूत असे काही महत्त्व नसतेच. सर्व दिवस सारखेच, सोमवार शिवाचा, गुरुवार दत्ताचा याला काहीच अर्थ नाही. हे कॉमनसेसने समजते.

म्हणजे अंगारकी चतुर्थी हा इतर दिवसासारखा एक दिवस. मग या दिवशी गणेशमंदिरासमोर सहस्रावधी माणसे रांगा का लावतात ? अंगारकीला दर्शन घेतले, फुले, नारळ, पैसे वाहिले, की देव विशेष संतुष्ट होतो. कृपा करतो. समृद्धी लाभते. असे श्रद्धाळूना वाटते. तसेच रूढी, गतानुगतिकता यांचा पगडा असतोच. त्यामुळे रांगा लागतात. अंगारकीविषयी स्वबुद्धीने थोडा विचार केला तरी या दिवसाला कोणतेही महत्त्व नाही हे ध्यानी येईल. पण सत्य काय आहे ते जाणून घेण्यास नकार देणारी मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धावन्ताला सत्य नको असते. सदैव अज्ञानाच्या अवगुंठनात लपेटून राहाणे सुरक्षित वाटते. श्रद्धेची चिकित्सा करण्याचे धैर्य नसते. सुधारककार आगरकर लिहितात, "आपल्या प्राप्तीचा आकडा खर्चाच्या आकड्याशी ताडून पाहाण्याचे धैर्य ज्याप्रमाणे दिवाळखोर कर्जबाजायस होत नाही त्याप्रमाणे श्रद्धाळूस आपल्या धर्मसमजुती आणि त्यावर आधारित आचार बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही. तसे केले तर त्या समजुर्तीची धडगत नाही अशी भीती त्याला वाटते."



2 comments:

YCMOU history

https://kundanmalake.blogspot.com/p/history-books.html?m=1